logo

Search Here

JNUमधील विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना ठेवले डांबून

नवी दिल्ली, दि. 20 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदसाठी सुरू असलेले आंदोलन काल रात्री (बुधवारी) अधिक तीव्र झाले. बायोटेकच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, रजिस्ट्रार यांच्यासह 10 अधिका-यांना प्रशासकीय भवनात डांबून ठेवून, निदर्शने केली. नजीब बेपत्ता होऊन पाच दिवस झाले तरीही त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जवळपास 200 विद्यार्थ्यांनी कॅम्पसबाहेर संताप व्यक्त करत रात्रभर निदर्शने केली. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, मात्र विद्यार्थी त्यांचे काहीही ऐकले नाही.

'दुपारी 2.30 वाजल्यापासून आम्हाला भवनात कोंडून ठेवण्यात आले. यातील एका महिला सहका-याला मधुमेहचा त्रास असल्याने त्यांना त्रासदेखील झाला', असे सांगत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला. तर दुसरीकडे, जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडेयने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बाजू मांडत सांगितले की, 'आम्ही कुणालाही बेकायदेशीर स्वरुपात बंद करुन ठेवले नव्हते, विद्यापीठात सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या, तसेच आम्ही त्यांना जेवणही पुरवले होते',असे स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांच्याशी बातचित करुन परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे.

बायोटेकचा विद्यार्थी नजीब अहमद शनिवारपासून बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता होण्याआधी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे वृत्त मिळत आहे. नजीबचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!