logo

Search Here

डेबिट कार्डांवर 'सर्जिकल स्ट्राइक'

मुंबई : भारतातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्डांचा डाटा चोरीस गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. फटका बसलेल्या कार्डधारकांना नवीन कार्डे देण्याचा निर्णय काही बँकांनी घेतला आहे, तर काही बँका पासवर्ड बदलण्याचा सल्ला देणार आहेत. भारतीय बँकिंग व्यवस्थेवर हा सर्जिकल स्ट्राइकच समजला जात आहे.

आपल्या कार्डांचा चीनमधील अनधिकृत ठिकाणांहून वापर झाल्याचे काही कार्डधारकांना आढळून आले. चौकशी अंती डाटा चोरीस गेल्याची माहिती समोर येत आली. माहिती चोरीचा सर्वाधिक फटका व्हिसा आणि मास्टर-कार्ड या कार्डांना बसला आहे. या दोघांची मिळून, तब्बल २६ लाख कार्डांची माहिती चोरीस गेल्याचा संशय आहे. याशिवाय ६ लाख रुपे प्लॅटफॉर्मच्या कार्डांनाही फटका बसला आहे. या महाचोरीचा फटका बसलेल्या बँकांत स्टेट बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. एसबीआय आपल्या ६ लाख कार्डधारकांना कार्डे बदलून देणार आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेसच्या यंत्रणेतून ही चोरी झाल्याचे सांगण्यात येते.

एटीएम, पॉइंट आॅफ सेल (पीओएस) आणि अन्य वित्तीय व्यवहारविषयक सेवा हिताची पुरविते. येस बँकेच्या एटीएम केंद्रांवरून ही हेराफेरी झाला आहे. येस बँकेच्या एटीएम केंद्रांची संख्या अत्यल्प असतानाही, या केंद्रांवरून सर्वाधिक व्यवहार होत असल्याचे जुलै महिन्यात आढळून आले होते. त्याची चौकशी केल्यानंतर, डाटा चोरीची माहिती समोर आली.

पेमेंट्स कौन्सिल आॅफ इंडियाने (एनपीसीआय) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक ए. पी. व्होटा यांनी सांगितले की, 'आमची कार्डे चीनमधून वापरली जात असल्याच्या असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. बहुतांश बनावट व्यवहार व्हिसा आणि मास्टर-कार्डवरून झाले असले, तरी संपूर्ण नेटवर्कचे फोरेन्सिक आॅडिट करण्यात येईल.'

एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'अलीकडच्या काळात अन्य बँकांच्या एटीएम केंद्रांचा वापर करणाऱ्या आमच्या ग्राहकांना पासवर्ड बदलण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. एचडीएफसीचेच एटीएम केंद्रे वापरण्याच्या सूचनाही ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एटीएम यंत्रांवर स्किमर बसवून अथवा पासवर्ड पडकण्यासाठी कॅमेरे बसवून असे घोटाळे केले जायचे. या प्रकरणात घोटाळेबाजांनी थेट हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्युलमध्येच शिरकाव केला असावा, असा संशय आहे.'

येस बँक, हिताची यांनी डाटा चोरीची माहिती फेटाळली

येस बँक आणि

हिताची यांनी डाटा चोरीला दुजोरा देण्यास नकार दिला आहे. सुरक्षेशी तडजोड झाल्याचे दिसून आले नाही, असे दोघांकडूनही सांगण्यात आले.

येस बँकेच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही आमच्या एटीएम केंद्रांचा आढावा घेतला आहे. त्यात कोठेही सुरक्षेशी तडजोड झाल्याचे अथवा माहिती चोरी झाल्याचा पुरावा सापडलेला नाही.

आमची एटीएम केंद्रे आणि पेमेंट सेवा पूर्ण सुरक्षित आहेत. आम्ही खासगी क्षेत्र, खासगी बँका आणि एनपीसीआय यांच्यासोबत पुढेही काम करीत राहू.

हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक लोने अँटोनी यांनी सांगितले की, 'प्रथमदर्शनी तरी यंत्रणेत तडजोड झाल्याचे दिसून येत नाही. तथापि, अंतिम अहवाल येईपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. बँकांनी कार्डे बदलून देण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. अनेक बँकांनी पासवर्ड बदलण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. तथापि, अशा सूचना नेहमीच दिल्या जातात.'

माहिती चोरीचा सर्वाधिक फटका व्हिसा व मास्टर-कार्ड या कार्डांना बसला आहे.

या दोघांची मिळून 26 लाख कार्डांची माहिती चोरीस गेल्याचा संशय आहे.

06 लाख रुपे प्लॅटफॉर्मच्या कार्डांनाही फटका बसला आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!