logo

Search Here

‘उडान’चा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला

तासाभराचा विमान प्रवास २,५०० रुपयांत

 
नवी दिल्ली - विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने ‘उडे देश का आम नागरिक’ या घोषवाक्‍यासह आज घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचा शिर्डीसह राज्यातील सुमारे १० शहरांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचा विमान प्रवास अवघ्या दोन हजार पाचशे रुपयांत शक्‍य होणार आहे.
 
नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू व राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिल्लीत ‘उडाण’ योजनेची घोषणा केली. सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार ‘हवाई चप्पल’ (स्लीपर) घालणाऱ्या माणसांनाही हवाई प्रवास घडविणे, हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे. 
 
या योजनेअंतर्गत संबंधित शहरांत विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांनी दोन डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. पुढच्या तीन दिवसांत त्यांची छाननी केली जाईल व नंतरच्या किमान १० आठवड्यांत त्याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल, असे सरकारचे नियोजन असल्याचे राजू यांनी सांगितले. केवळ २,५०० रुपये तिकीट असले, तरी या योजनेसाठी खासगी विमान वाहतूक कंपन्यांनीही रस दाखविल्याचा दावा सिन्हा यांनी केला. 
दरम्यान, एखाद्या शहरास विमानसेवा पुरविण्यासाठी कुठलीही कंपनी पुढे आली नाही, तर ही योजना सुरू ठेवण्यासाठी ‘एअर इंडिया’ला पुढे यावे लागेल. त्यासाठी ‘एअर इंडिया’ सज्ज असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एका विमान कंपनीला एका मार्गावर तीन वर्षांसाठी व्यवसायाची मुभा व परवाना दिला जाईल. या योजनेंतर्गत विमानाच्या इंधनाच्या अबकारी शुल्कात दोन टक्‍क्‍यांची सूट मिळणार आहे. त्यामुळे तिकिटांची किंमत कमी असणार आहे. याशिवाय विमानतळ शुल्क व तिकिटांवरील अधिभारासह इतर करांमध्येही सूट देण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे.
 
कमी दरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील विकसित-प्रगत राज्यांनी मुख्यत्वे पुढाकार घेतला आहे. त्यातही महाराष्ट्राने सर्वाधिक रूची दाखविताना ‘उडाण’ योजनेबाबत केंद्राशी दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे. राज्यातील १० शहरे पहिल्या टप्प्यात या योजनेच्या ‘रडार’वर घेण्याचा सरकारचा मानस आहे. यात देशविदेशांतील भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीसह नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव या शहरांचा समावेश केला जाणार आहे. साधारणतः प्रत्येकी ३० ते ४० आसन क्षमतेची विमाने या मार्गांवरील सेवांसाठी वापरली जातील. 
 
जागेची अडचण कशी सोडविणार?
दरम्यान, खासगी कंपन्यांनी याबाबत विशेषतः मोठ्या विमानतळांवरील जागांबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ‘स्पाइस जेट’चे अजय सिंह म्हणाले की, ही योजना चांगली आहे; मात्र, छोट्या शहरांकडून महानगरांकडे येणारी विमानेही यात असणारच आहेत. त्याच वेळी मुंबई, चेन्नई, दिल्ली यांसारख्या मोठ्या विमानतळांवर या सेवांसाठी विमानांना जागा कोठून देणार? कारण सध्या वर्दळीच्या वेळांत नियमित उड्डाणांसाठीही ही विमानतळे अपुरी पडत आहेत. अशा वेळी ‘आरसीएस’ योजनेतील विमानांसाठी मोठ्या विमानतळांवरील विशिष्ट जागा राखीव ठेवण्याच्या पर्यायावरही केंद्र सरकारने विचार करावा.
 
२,५०० रुपये 
एका तासाच्या 
विमानप्रवासाचे तिकीट
१०
शहरांना महाराष्ट्रात 
होणार फायदा
१५० किमी 
अंशदानासाठी 
आवश्‍यक अंतर
३०-४० 
विमानांमधील 
आसनक्षमता 
 
लाभ होणारी शहरे - शिर्डी, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव
 
‘उडान’ची वैशिष्ट्ये
विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याचा प्रयत्न
प्रादेशिक विमानसेवेतील अर्धी तिकिटे सवलतीत; त्यासाठी सरकारकडून अंशदान
त्याबदल्यात देशांतर्गत विमानसेवेच्या तिकिटांवर अधिभार आकारण्यात येणार
२,३५० ते ५,१०० रुपये प्रतिआसन अंशदान तीन वर्षांसाठी मिळणार
२०३२ पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या ३० कोटी करण्याचे उद्दिष्ट
पुढील वर्षीपासून (जानेवारी २०१७) योजनेची अंमलबजावणी होणार
महाराष्ट्रासह देशातील प्रगत राज्यांचा योजनेसाठी पुढाकार
Source:-esakal.com
Image Source esakal.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!