logo

Search Here

तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, अनेकांचा गोंधळ उडाला आहे. 500 आणि 1000 च्या नोटांचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मात्र घाबरण्याचं कारण नाही हे कालच मोदींनी सांगितलं आहे. कारण 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील.
सध्या पाचशे-हजारच्या नोटा कुठे चालतील?
बँक  आणि पोस्ट ऑफिस
तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही.
पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे.
समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल.
पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल.
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल.
पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही
बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही.
खात्यावरुन किती पैसे काढू शकाल?
तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल.(त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील)
त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील.
ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.
प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा
तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल.त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल.
ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.
Source - abpmajha.abplive.in
Image Source - abpmajha.abplive.in

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!